जालन्यात भर दिवसा ३८ वर्षीय शेख रफीक शेख कासिम यांची निघृण हत्या..!
जालना, प्रतिनिधी : जालना शहरातील पंचमुखी मंदिर परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती किंवा व्यक्तींनी संबंधित तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैयक्तिक बाद, जुने वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे पंचमुखी मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, शहरातील भरवस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.